Saturday, October 5, 2013

काही गोष्टी सुटलेल्या..

जेव्हा पासून हे ठरलं कि मी जर्मनी ला शिकायला जाणार, तेव्हापासून मनात होतं काहीतरी लिहायचं. पण जाण्यातही एवढे सतराशे साठ विघ्न आले कि लिहिणं तर दूर, आपण जाणार तरी आहोत कि नाही याचीच शंका यायला लागली. मी जायच्या एक दोन दिवस आधी एक मैत्रीण म्हणाली सुद्धा, आता या सगळ्या प्रोसेस वर एक ब्लॉग पोस्ट लिही. मनात म्हणलं लिहायचं तर आहेच, पण काय हे काही माहित नाही.

विचार करायलाही वेळ मिळाला नाही एवढ्या गडबडीत भारतातले शेवटचे काही दिवस गेले. जाण्याची गडबड, मित्रमैत्रिणीना भेटणं, विसा चे रोज उद्भवणारे नवीन प्रॉब्लेम्स, शॉपिंग, त्यात स्वतःवर ओढवून घेतलेला नाटकाचा झांगडगुत्ता, शेवटचे काही दिवस तर मी काय करतोय मलाच कळत नव्हतं. भेटणारी प्रत्येक व्यक्ती विचारायची कसं वाटतंय, आता किमान दोन वर्ष भारताबाहेर, परत येशील तेव्हाही सगळं बदलेलं असेल. मी म्हणायचो काही वाटण्याएवढा seriousness अजून आलाच नाहीये. तेव्हा या सगळ्या भावना Register च नव्हत्या झाल्या. डोक्यात वेगळीच चक्रं सुरु असायची.

इथे आल्यावर मात्र हळू हळू जसं नव्याच नवेपण उतरू लागलं तसं एक एक गोष्ट जाणवू लागली. यापुढे दोन वर्षं तरी किमान काय काय करता येणार नाही याची लिस्ट मनात हळू हळू तयार होऊ लागली, आणि मन उदासवाणं होऊ लागलं. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांना भेटणं नाही. WhatsApp वगैरे किती भंपक गोष्टी आहेत याची पहिल्यांदाच जाणीव झाली. तुम्ही कितीवेळ तुमच्या भावना टक टक करत type करत बसणार.

दुसरं म्हणजे पुणे. यापुढे कधीही उठलो गाडी काढली आणि निघालो असं करता येणार नाही. खिशात नेहमी map ठेवा, ट्राम, ट्रेन्स चे time table पाठ करा, एक बस सुटली कि झालं, मग धावत धावत जवळचे रेल्वे स्टेशन गाठणे. निरंजन नाही, गुडलक नाही, वैशाली नाही, maggi point नाही, निरुद्द्देश्य गाडीवर फिरणे नाही, कॉलेज समोर चा अण्णा नाही, रात्री ३ ला कमसम ला जाणे नाही, गणपती मध्ये ढोलांचा घुमणारा नाद नाही, गणपतीची मिरवणूक नाही, दिवाळीची सारसबाग नाही, पुरुषोत्तम नाही, फिरोदिया नाही, कॉलेज च्या नावाने ओरडणे नाही, थोडक्यात काहीच नाही.

कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या. काय होतंय, आहे अजून वेळ, आपण कुठे चाललोय, करू निवांत असं करता करता मी कधी निघून गेलो कळलंच नाही. एकदा जबलपूर ला नवरात्रात जायचं होतं. ५ वर्ष कॉलेज, कामाच्या निम्मिताने जाणे झालेच नाही. आता कधी होईल काय माहित. ग्वारीघाट ला जायचं होतं, नाही झालं. कित्येक पुस्तकांची लिस्ट काढून ठेवली होती वाचण्यासाठी, नाटकं, सिनेमे बघायचे होते, राहून गेले. अश्या असंख्य गोष्टी. कितीदा जाऊदे म्हणून सोडून द्यायचं.

हे सगळं कोणाला सांगू लागलो कि प्रत्येक जण म्हणतो एवढं होतं तर मग गेलाच कशाला? इथे जगत नाहीत का लोकं? करायचं इथेच काहीतरी. ते ही खरंच आहे म्हणा. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्ही एकतर ठाम राहू शकता, किंवा त्याबद्दल जन्मभर रडू शकता. पण एखाद्या गोष्टीवर ठाम राहायचं म्हणजे हातातून सुटत चाललेल्या गोष्टींबद्दल काहीच वाटू द्यायचं नाही का? का वाटत असलं तरी बोलायचं नाही, व्यक्त व्हायचं नाही?

असंच एक दोन दिवासंपूर्वी नेट वर फिरत असताना काही खूप सुंदर ओळी सापडल्या -

शहर बदलते ही ज़िन्दगी जीना सीख लिया उस समझदार ने,
और एक हम है की बेवकुफो की तरह मुल्क बदलते रहे जिन्दा रहने के लिए.

काहीतरी मनातलं, काहीतरी पुण्यातलं या ब्लॉग वरची माझी हि बहुदा शेवटची पोस्ट. या पुढे पुण्यातलं लिहायला मी पुण्यात नसणार. काही लिहिलंच तर नाव गाव बदलून.

काही झाडांची मुळं खूप लौकर कुठलीही माती धरतात आणि फळू फुलू लागतात. काहींना मात्र सारखी माती बदलत राहावी लागते, त्याचं बस्तान बसे पर्यंत.


बघू आता, हे झाड कधी, आणि कुठली माती धरतय ते.

Friday, August 9, 2013

भेट


गंधार सतत घड्याळाकडे बघत होता. तसा तो वेळेच्या आधीच पोहोचल्या असल्या मुळे त्रागा करून काही अर्थ नाही हे त्यालाही माहित होतं. पण त्याच्या अस्वस्थतेला कारण ही तसच होतं. कितीतरी वर्षांनी तो मेधा ला भेटत होता. कॉलेज संपल्यावर बहुदा पहिल्यांदाच. ४-५ वर्ष तर नक्कीच झाली. का भेटलो नाही? खरंतर काहीच कारण नव्हतं. या नं त्या गोष्टीमुळे राहून गेलं. आधी तिचं बंगलोर ला ट्रेनिंग, मग future च्या प्रोजेक्ट साठी आपलं भारत भ्रमण, आणि त्यांनंतर संपर्क तुटला तो तुटलाच. त्याला वाटलं आपण उगाच आपली कारणं शोधायचा प्रयत्न करतोय. गेली किमान ३ वर्ष ती पुण्यातच होती. तो ही येऊन जाऊन इथेच असायचा. भेटायचं म्हणलं तर कधीही भेटता आलं असतं.
पण मग नं भेटण्यासारखं तरी काय होतं? काहीच नाही. घाईगडबडीत कशाला? निवांत गप्पा मारायला भेटू या विचारातचं एवढी वर्षं कधी निघून गेली कळलचं नाही.
एखादं पुस्तक असतं. लहानपणी आपल्याला खूप आवडलेलं आणि नंतर कुठेतरी गहाळ झालेलं. कित्येक वर्षांनी पुढे आपल्याला असंच एखाद्या दुकानात बुकशेल्फ वर दिसतं आणि किंमत वगैरे काहीही विचार नं करता आपण ते घरी घेऊन येतो. कधी एकदा हे पुस्तक वाचतोय असं होऊन जातं अगदी. पण कितीही असं वाटतं असलं तरी ते पुस्तक वाचायचं राहूनच जातं. घाईत नको निवांत वाचू म्हणून कधी ते घरातल्या बुकशेल्फ वर जाऊन बसतं कळतही नाही. दरवेळेस ते पुस्तक उघडावं आणि काहीतरी वेगळंच आठवावं. एकाच वेळी ते वाचायचंही असतं आणि नसतही. भीती असते कुठेतरी मनात की लहानपणी आवडलेलं ते पुस्तक आता बालिश वाटेल. लहानपणीच्या आठवणींना गालबोट लागेल.
तसच काहीसं झालं होतं त्यांच्या मैत्रीचं.
गंधार ला स्वतःच्याच विचारांची मजा वाटली. त्यांच्या मैत्री ला पुस्तकाची उपमा देणं ही गंमतच होती. दोघांच्या मैत्रीची सुरुवात हीच पुस्तकांनी झालेली. वाचन हा त्या मैत्रीतला महत्वपूर्ण बंध होता.
तेवढयात दुरून ती येताना दिसली. अगदी वेळेवर. नेहमीसारखीच. नकळत गंधार चा हात त्याच्या केसांवरून फिरला आणि दुसऱ्याच क्षणी त्याला त्या गोष्टीचं हसू आलं.
‘काय रे असा एकटाच हसतोयस काय?’
‘काही नाही, सांगतो नंतर. इतक्या वर्षात बिलकुल बदलली नाहीएस तू. काय कसा आहेस वगैरे काही नाहीच. लगेच आल्या आल्या असा का उभा आहेस, तसा का हसतो आहेस.’ तो हसत-हसतच म्हणला.
‘अरे मग काय. रस्त्यावर एकटाच वेड्यासारखा हसत उभा राहिलास तर वेगळं काय विचारणार?’ त्याच्या लक्षात आलं की तिनेही अगदी लाईट मेकअप केलाय.
‘ते सोड.काहीतरी खाऊ आधी. मला जाम भूक लागलीये. तू पहिल्यांदा येतेस नं इथे? इथला वडा जाम भारी असतो, आणि फिल्टर कॉफी अगदी आपल्या अण्णा सारखी.’
‘आहा. अण्णाची फिल्टर कॉफी. काय बेस्ट असायची रे ती. आणि ते लहान स्टील चे पेले. विसरलेलेच इतक्या वर्षात मी ते.’
दोघंही ऑर्डर देऊन एकमेकांकडे बघत बसले. काही क्षण दोघांना काय बोलावं कळलंच नाही. या गोष्टीचही गंधार ला हसू आलं.
‘हे बघ, परत हसतो आहेस. एवढं काय घडलंय हसण्यासारखं?’
‘सांगतो, सांगतो. पण आत्ता आणि तेव्हा दोन वेगळ्या कारणांने हसत होतो. मुद्दा एकचं कारण दोन.’
‘सांगणार आहेस की असंच पाल्हाळ लावणार आहेस?’
‘अगं, मघाशी तू येताना दिसलीस आणि नकळत माझा हात केसांवरून फिरला, शर्ट नीटनेटका करू लागला. तुझ्याकडे बघितलं तर तू ही लाईट मेकअप करून आलेलीस. आत्ताही समोरासमोर बसलो तर काय बोलावं तेच कळलं नाही दोन मिनिट. किती बदललोय गं आपण मेधा. असं नीटनेटके आहोत की नाही याचा विचार करणं, भेटल्यावर काय बोलावं हे नं सुचून शांत बसणं. किती नीरस झालोय आपण आयुष्यात.’
मेधा हे ऐकून मनापासून हसली. ‘खरंच किती म्हातारं झालंय आपलं आयुष्य. आधी भेटायचो तेव्हा एवढं काही असायचं सांगायला की पहिले दोन मिनिट कोण काय बोलतय हेच कळायचं नाही. आणि आता बघ.’
‘बोलायला तर अजूनही खूप काही आहे. पण unnecessary manners खाली दाबल्या गेलंय ते.’
‘माझं ठीक आहे. मी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये आहे. मला हे असे ettiquetes पाळावे लागतात रोजच्या आयुष्यात. पण तुझं काय? Freelance photographer तू. स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम करणारा. तुला कुठून लागल्या या वाईट सवयी?’ ती मिश्कील पणे म्हणाली.
‘ओ मॅडम! Freelance असलो तरी काम मिळवायला हे उपद्व्याप करावेच लागतात आम्हालाही.’
तेवढयात वेटर ऑर्डर घेऊन आला.
‘Coffee खरंच छान आहे इथली. पण अण्णाच्या कॉफी ची मात्र चव नाही हां याला.’
‘ए जा तू. एवढं काय असायचं त्या अण्णा च्या कॉफी मध्ये देवाला ठाऊक.कुठल्याही उडुपी हॉटेल मध्ये मिळेल तशीच कॉफी असायची ती. काय अमृताची चव लागायची तुला ते तुझं तुला माहित.’
‘काय माहित. खरंतर मलाही कधीकधी वाटतं त्या कॉफी पेक्षा त्या वातावरणाची धुंदच जास्त असायची मनावर. त्या वातावरणालाही चव होती बहुदा वेगळी. ते ग्रुप्स, भांडाभांडी, आणि गरम कॉफी पेक्षाही चालेल्या गरम-गरम चर्चा आणि वाद.’
दोघंही खळखळून हसले. कित्येक दिवसांनी त्याला एवढं जिवंत वाटत होतं. खूप जुना फोटोंचा अल्बम उघडून बसावं तसं.
‘ ए तुला ती मधुरा आठवते का रे? आपल्या प्रत्येका Function मधे गायची बघ? तुम्ही गरिबांची शोभा गुर्टू म्हणायचा तिला.’
‘कोण ती शोभा गुटूर्गु? गायची कसली, मोहित बरोबर flirt करायची फक्त सगळीकडे.’
‘हां तीच. तिचं आणि मोहित चं लग्न झालं गेल्या महिन्यात.’
‘काय? एवढ्या लौकर?’
‘लौकर काय गंधार? उलट उशीरच झाला होता. त्यातून मोहित सेटल नाही नीट. तरी झालं बाबा एकदाचं.’
‘ए उशीर काय म्हणतेस? या वयात कोण लग्न करतं?’
‘हॉ हॉ. कोण लग्न करतं म्हणे. तुमच्या कोशातून बाहेर या जरा. आपल्या batch ची ८०% लोकांची लग्न झाली तरी आहेत किंवा किमान ठरली तरी आहेत.’
‘असेलही. लग्न बिग्न विषयांपासून मी जरा दूरच असतो. मला सांग मग तू पण का नाही ठरवून टाकत आता? करियर तसं सेटल झालंय आता व्यवस्थित तुझं.’
‘आई आजी हात धुवून मागे लागलेत आधीच, तू सुद्धा तेच विचार. खरं सांगू का गंधार, मला ना लग्न करावसं वाटतंच नाही रे. आधीही नव्हतं वाटत, आत्ताही नाही. I mean, रोहित बद्दल खरंच सिरीयस होते मी. पण त्याचं ते तसं, सगळंच विचित्र झालं रे. रोहित धोरणी होताच. मलाही कुठेतरी जाणीव होती की त्याचं ultimate aim अमेरिका आहे. पण त्याच वेळी मनात हेही वाटलेलं की हा आपल्यासाठी तरी थांबेल. त्याला पूर्णपणे माहित होतं की आई आणि आजी ची सगळी जवाबदारी माझ्यावर आहे. स्पष्टपणे म्हणतो – “आई ला हवंतर घेऊन जाऊ, आजीला ठेऊ वृद्धाश्रमामध्ये. Be practical.” इतकी चीड आली नं त्याची. हा तोच रोहित आहे का अशी शंका आली.’
‘पण मग नंतर? ऑफिस, बाहेर कोणीच आवडलं नाही?’
‘एक दोघं जण आवडली होती. पण खूप थोड्या वेळासाठी टिकली ती नाती. माझ्या नं एक लक्षात आलंय गंधार. मी मुळातच खूप स्वयंभू आणि स्वतःमध्ये रमणारी मुलगी आहे. रोहित साठी आयुष्यात, स्वभावात बऱ्याच तडजोडी, बरेच बदल केले. कारण तो रोहित होता. पण बाकीच्यांसाठी एवढीही तडजोड सहन होत नाही.
आणि जाऊदेत ना. मी आहे तशी सुखी आहे. मनासारखं कमावते, पाहिजे तसं खर्च करते. आई, आजी, मी. Happy आहोत आम्ही तिघी एकमेकांबरोबर. शेवटी तेच महत्वाचं असतं ना?’
‘Yes, I guess.’
काही वेळ दोघंही शांत बसून होती. मग तो स्वतःशीच बोलल्यागत बोलू लागला.
‘तुला आठवतं मेधा, कॉलेज मध्ये सारखं तू मला मिडिल क्लास मिडिल क्लास चिडवायचीस? मला जाम राग यायचा तुझा. खरंतर आपण दोघंही सामाजिक, आर्थिक दृष्ट्या एकाच पातळीवर होतो.’
‘एकाच का?’ तिने मिश्किलपणे त्याचं बोलणं तोडत विचारलं. ‘उगाच modest होऊ नकोस. तुम्ही आमच्या पेक्षा कितीतरी पटींनी सुखवस्तू, श्रीमंत होता.’
‘तेच ते.  पण तुझं म्हणणं काय तर माणूस सामाजिक स्थितीने नाही तर त्याच्या विचारांने मध्यमवर्गीय ठरतो. पटायचं नाही तेव्हा. पण आज वाटतं बरोबर होतं तुझं. हेच पहा ना. तू मोकळी आहेस, आनंदी आहेस, आई आजीची व्यवस्थित काळजी घेतेस. मुख्य म्हणजे स्वतःच्या पायांवर उभी आहेस. करियर जोरात आहे. पण मला चिंता कसली, तर तुझं लग्न करायची इच्छा नाही. आयुष्यात पुढे कशी जाशील, सुखी कशी होशील हे सगळे प्रश्न येतात मनात तुझं बोलणं ऐकून. जणू लग्न केल्याशिवाय माणूस सुखी होऊच शकत नाही.’
‘तसं नाही रे. तुला वाटतं तसं मलाही कित्येकदा वाटतंच. आईचं आणि माझं तर हजारदा या विषयावरून भांडण झालंय. आजीचे जप, तप, उपास, तापास सगळे करून संपलेत. आणि मलाही वाटतंच कधीतरी. लग्न करावं, छान घर, family असावी. Peer pressure ही असतंच शेवटी. पण हे सगळं दोन क्षणच येतं मनात. तिसऱ्याच सेकंदाला वाटतं, आपण स्वतःवर जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम करणारा भेटणारे का आपल्याला? माझ्या प्रमाणे वागणारा? आणि नसेलच भेटणार तर काय उपयोग अश्या तडजोडीच्या नात्यांचा?’
‘आणि भेटला समज एखादा असा तर?’
‘भेटला तर बघीन ना. मी काही संत, संन्याशी, किंवा अगदी faminist वगैरे नाही, लग्नाचा तिरस्कार करायला. मला एवढंच वाटतं की त्या संस्थेत मी बसत नाही.
जाऊदेत. माझं सोड. तुझं काय सुरु आहे? सारखं आपलं मलाच प्रश्न विचारतो आहेस. काम धाम काय म्हणतंय?’
‘काम काय गं, म्हणलं तर चाललंय जोरात, म्हणलं तर काहीच नवीन दिसत नाहीये करायला. सगळं तेच तेच आणि तेच तेच. कोणाला सांगितलं ना हे, तरी कळत नाही. बाबा विचारतात तेच तेच नसणार तर काय सगळीकडे हेच असतं. आई म्हणते प्रत्येकाला एवढ्या वेगळ्या क्षेत्रात करियर करायला मिळत नाही. Lucky आहेस.
पटतं गं सगळं. पण माझी तगमग का होते ते कसं समजावून सांगू लोकांना. मलाच समजलंय की नाही हाही प्रश्न पडतो. पण काही झालं तरी हा प्रवास इथेच संपतोय हे मात्र नक्की. अजून बोललो नाहीये कोणालाच, पण नॉर्वे हून एक ऑफर आलीये internship ची. पैसे जास्त मिळणार नाहीएत. इथल्या तुलनेत तर काहीच नाही. करियर ची पण बसलेली घडी विस्कटेल. पण जेव्हा पासून ती संधी आलीये, मला नॉर्वे सारखं खुणावतंय. घरी महाभारत होणारे मी सांगितलं की. पण मी जायचं नक्की केलंय.’
‘कधी निघणार आहेस?’
‘साधारण ३-४ महिन्याने. आता आयुष्याचा next stop - Norway.’
तिच्या ओठांवर ओळखीचं हसू उमटलं.
‘मला आठवतं अजून. कॉलेज मध्ये असताना, फेब्रुवारी, मार्च सुरु झाला कि तू एकदम खूष व्हायचास. कोरडा वारा, उबदार सकाळ, मोहाच्या फुलांचा सुटलेला वास. सगळं साठवून घ्यायचास जणू शरीरात. उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे असं भेटेल त्याला सांगायचास.
हा सगळा उत्साह तुझा १५-२० दिवस टिकायचा. मग मात्र २ महिने गर्मी, उन्ह, घाम यांच्या नावाने शिमगा. कि परत जून-जुलै मधे उत्साहात. ओल्या मातीचा वास, हिरवळ जणू बोलायला लागायचे तुझ्याशी. परत पावसाळा माझा सर्वात आवडता ऋतू आहे म्हणून announcement. तुला ना मुळात कुठलाच ऋतू आवडायचा नाही गंधार. आवडायचा तो फक्त बदल. तुझा उत्साह असायचा तो फक्त त्या बदलासाठी.’
तिच्याकडे बघून तो ओशाळल्यागत हसला. तिच्या बोलण्यात तथ्य आहे हे त्यालाही माहित होतं. थोडावेळ दोघं काही नं बोलता नुसते बसून राहिले. कित्येकदा शांतता ही जास्त बोलकी ठरत असते बहुदा.
मेधा चा फोन वाजला.
‘आईचा फोन आहे. निघायला हवं.’ ती इच्छा नसल्यासारखी बोलली.
‘खूप बरं वाटलं मेधा भेटून. एक निखळ नात्याची छायाचित्रं धुसर झाली होती, ती पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छ झाल्याचं समाधान मिळालं.’
‘आपण परत-परत भेटलं पाहिजे रे.’
‘खरंच.’
‘नुसतं तोंडदेखलं म्हणू नकोस. पुन्हा भेट कधी ते सांग.’
‘अशीच कधीतरी. ते लहानपणी चं पुस्तक पुन्हा उघडून वाचावसं वाटलं की लगेच.’
एवढं बोलून तिला काही विचारण्याची संधी नं देता तो bye म्हणून त्याच्या गाडीच्या दिशेने चालू लागला. तिला तो काय बोलला काहीच कळलं नाही. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत राहिली. तिला तो कधीच पूर्णपणे समजला नव्हता. त्यालाही ती कळली नाहीच बहुदा. पण याने त्यांच्या मैत्रीवर कधीच फरक पडला नाही.

एक प्रसन्न संध्याकाळ सरत होती. ती ही तिच्या घराकडे निघाली. झटपट पडणाऱ्या काळोखात दोघं कधी विरून गेली कुणालाच कळलं नाही.

Monday, April 15, 2013

स्पंदन मधले दिवस..!


मला अजूनही माझा स्पंदन मधला पहिला दिवस आठवतो. डिसेंबर जानेवारी चे दिवस होते. फर्स्ट इयर फर्स्ट सेमेस्टर संपलं होतं. फर्स्ट इयर चे आम्ही सगळेच कॉलेज मधे रुळलो होतो. तेव्हा एक दिवस पार्किंग मध्ये स्पंदन चं पोस्टर दिसलं. वर्कशॉप फॉर फिरोदिया. हळूहळू कॉलेज मध्ये सगळेच फिरोदिया बद्दल बोलू लागलेले. एकांकिका स्पर्धा. पुण्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा, कित्येक कॉलेजेस, या स्पर्धेतून पुढे गेलेले कित्येक मोठे कलाकार. साहजिकच उत्सुकता वाढली. फिरोदिया वगैरे बद्दल काहीच माहिती नव्हती पण सगळेच मित्र वर्कशॉप ला जाणार हे बघून आपणही जायचं धाडस करायचं ठरवलं. संध्याकाळी ५ नंतर कॉलेज च्या एका रूम मध्ये प्रेक्टीस व्हायची असं कळलेलं, तिथे जाऊन पोचलो. एका सीनियर ने सगळ्यांना गोलात बसवून ओंकार घेतला आणि एकदम काहीतरी वेगळंच वाटलं. दिवसभराचा शिणवटा एकदम निघून गेल्यासारखा वाटला. शरीरात नवीन उर्जा आलीये असं जाणवलं. आणि फिरोदिया बद्दल उत्साह अजूनच वाढला.


 खरं म्हणजे वर्कशॉप च्या पहिल्याच दिवशी लक्षात आलं की आपण इथले नाही. एक्टिंग, डांस, म्युसिक हा आपला प्रांत नाही. तिथे आलेल्या एकाहून एक चांगल्या कलाकारांना बघून माझं माझ्याच लक्षात आलं होतं की आपण काहीच कामाचे नाही. आपण आजपर्यंत यातलं काही शिकायचे कष्टही घेतले नाहीत याचा विषाद ही वाटला. आयुष्याची घालवलेली १८ वर्ष वायाच गेली असं वाटू लागलं. पण तेवढयात तिथे कळलं की आपल्या सारख्या साठी पण इथे काम आहे. backstage. backstage म्हणजे सेट बनवणं, ठोका ठाकी करणे, बाहेरून लागेल ते समान आणणे, blackout मध्ये सेट बदलणे वगैरे वगैरे. जुन्या मेम्बर्स कडून असेही कळलेले की backstage म्हणजे gossips, time-pass, गप्पा टप्पा मारायचं ठिकाण. परत backstage मध्ये जायला auditions वगैरे देखील नाहीत. म्हणलं चला. आपल्यासाठी अगदी उपयुक्त काम आहे.  time pass करायचा, गप्पा बिप्पा मारायच्या, ओळखी वाढवायच्या झालं. हळू हळू काम सुरु झाल्यावर मात्र लक्षात आलं की हे काम तर सगळ्यात कठीण आहे. बाकी सगळ्या टीम ला त्यांच काम संपल्यावर घरी जाता यायचं, backstage च काम मात्र सगळ्यांची काम संपल्यावर खरं सुरु व्हायचं. टीम च्या प्रत्येकाचा राग येता जाता backstage वर निघायचा. backstage कडून एक चूक झाली तर त्यामुळे onstage कडून ४ चुका व्हायच्या. पण त्याचबरोबर time-pass पण व्हायचा. नवीन खूप काही शिकायला मिळायचं. दिवसभर संध्याकाळचे ५ कधी वाजतील असंच वाटत रहायचं. एकूण सगळं मजेत सुरु होतं.

करता करता स्पंदन आयुष्याचा महत्वाचा भाग कधी झाला कळलंच नाही. तो इवेंट संपला. त्यानंतर असे कित्येक इवेंट झाले. आर्ट सर्कल मात्र आयुष्यात जे एकदा आलं ते कायमचंच. आम्हा हॉस्टेल वाल्यांसाठी तर स्पंदन म्हणजे घरासारखच होतं. लोकं आमच्यासाठी डबा आणायचे. प्रेक्टीस मुळे उशीर झाला की घरी झोपायला जायला स्पंदन मधल्या मित्रांचं हक्काचं घर असायचं. मजा यायची. आमच्यासाठी खरं कॉलेज संध्याकाळी ५ नंतर च सुरु व्हायचं. जून जुलै ऑगस्ट. जानेवारी फेब्रुवारी मार्च. या काळात खरा स्पंदन मेंबर तुम्हाला संध्याकाळी घरी बसलेला दिसणारच नाही. त्याचा मुक्काम २०२ किंवा ३२० मधेच असणार. क्लासेस ना आमचा attendance तसाही कमीच. पण कधी जरी बसलोच तर अगदी प्रोफेसर सुद्धा ‘काय स्पंदन? लेक्चर कळतंय का?’ अशी विचारपूस करायचे. आर्ट सर्कल ही नकळत आमची कॉलेज मधली identity होऊन बसली होती. पुरुषोत्तम,फिरोदिया,gathering सगळं अगदी घरचं कार्य असल्यासारखं केल्या जायचं. इवेंट च्या दिवशी तर अगदी लगीन घर असल्यासारखी घाई गडबड सुरु असायची. पास आउट सिनिअर्स यायचे. टेम्पो समोर नारळ फोडला जायचा. टीम अगदी सज्ज व्हायची एक चांगला performance द्यायला.

स्पंदन मुळे कॉलेज ची ४ वर्ष चुटकीसरशी निघून गेली. उराशी एक स्वप्न बाळगलं होतं, आपल्या कॉलेज ला करंडक मिळवून द्यायचं, ते पूर्ण नं होण्याची खंत घेऊन पास आउट झालो. स्पंदन ने आम्हाला काय दिलं? स्वतःमधला talent कळला तो स्पंदन मुळेच, आपण लिहू शकतो हा विश्वास दिला स्पंदन नेच. लोकांशी कसं वागायचं, लोकं संग्रह कसा वाढवायचा, टीम कशी बांधून ठेवायची, जगात कसं वागायचं हे स्पंदन मुळेच शिकायला मिळालं. त्यासाठी प्रत्येक स्पन्दनाईट आपल्या आर्ट सर्कल चा जन्मभर ऋणी आहे.

 आज कॉलेज मधून बाहेर पडलोय. आयुष्य सुरु आहेच. तरीही कधी संध्याकाळी कॉलेज वरून गेलो तर आत डोकावून बघावसं वाटतं. असं वाटतं की ३२० मध्ये एखादा दिवा सुरु असेल, पुरुषोत्तम, फिरोदिया ची 
practice चालली असेल, आरडा ओरडा, गोंधळ, ओंकाराचा नाद ऐकू येईल. कॉलेज वरून पास होत असलो की मी मनाशीच Come On Modern असं पुटपुटतो. विचार दुसरीकडे वळणार इतक्यात आतून कोणीतरी जोरात Fight ओरड्ल्याचा भास होतो. माझ्यातलं स्पंदन अजूनही जिवंत आहे याची खात्री देत असल्यासारखा.


ता.क. - स्पंदन हे माझ्या कॉलेज चं आर्ट सर्कल. माझ्या आणि माझ्यासारख्या कित्येकांच्या जडण घडणीतलं महत्वाचं नाव. हा लेख मी सुमारे वर्षभरापूर्वी कॉलेज मॅग्झिन साठी लिहिलेला, बऱ्याच दिवसांनी laptop वर काहीतरी शोधत असताना सापडला. 

Tuesday, June 19, 2012

मैत्र


“राघव जेवण टेबलावर ठेवलंय. बाई येतील १२ ला तेव्हा वाढून देतील. काही लागलं तर फोन कर मला. गेम्स खेळत बसू नकोस दिवस भर. आधीच या accident मुळे बराच अभ्यास बुडलाय आपला. आणि बाथरूम ला जाताना cruches घेऊन जा,उगाच पराक्रम करू नकोस काही. मुग्धा आली अभ्यासाला तर भांडत बसू  नकोस तिच्याशी.”

“हो ,हो,हो आई.रोज काय आपले तेच तेच instructions? १२ वीत गेलोय ना आता,एवढं कळतं मला.”

“हो रे बाबा,काळजी वाटते एवढंच. चल निघते मी ऑफिस ला. राहशील ना नीट?”

“हो गं आई. जा तू. किल्ली घे आणि आठवणीने.”
                                    ११ वी ची परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशी मित्राच्या Activa वरून भर गुडलक चौकात राघव पडला. डावा पाय दोन महिने प्लास्टर मध्ये. आत्ता कुठे १५ दिवस झाले होते आणि राघव एवढ्यातच जाम कंटाळला होता. आधीच engineering entrance ची तयारी, त्यात क्लासेस बुडल्याचं टेंशन. नाही म्हणायला मुग्धा रोज दुपारी यायची. पण तिलाही अभ्यासच सुचायचा नुसता.
                                    दुपारी जेवून राघव TV बघत बसला होता, तेवढयात बेल वाजली. कोण आहे विचारे पर्यंत मुग्धा latch उघडून आत आली होती.

‘धा,तुला किल्ली काय उगाच दिली आहे का आई ने? बेल का वाजवतेस कारण नसताना?’ राघव चा मूड आज उखडलेलाचं होता.

‘अरे म्हणलं एकदम धडकायचं कसं. Manners नको का काही?’

‘माझ्या घरी कधीपासून Manners लागू लागले तुला?’

‘बरं. नाही वाजवणार उद्यापासून. काय चाललंय? आणि TV?? राघव,अभ्यास कोण करणार?’

‘तू. आणि प्लीज एवढी ओवर होऊ देत.’

‘नाही!! फिजिक्स मध्ये मागे पडतोय आपण. कळतंय ना? अजून projectile सुरु पण केलं नाहीये.’

‘हो गं. माहितीये. तू तुझं बायो कर त्यापेक्षा. माझी match संपे पर्यंत.’

‘मी केलंय ते सकाळीच. सकाळपासून किती अभ्यास झालंय तुझा?’

‘धा,तू माझी teacher नाहीएस.’ राघव चं सगळं लक्ष TV कडे होतं.

‘काल ४ तास झाला होता फक्त.’

‘१२ वी साठी पुरेसा आहे तेवढा सध्या.’

‘मग JEE चा फॉर्म भरूच नकोस ना.’

‘पुरे झालं. तुला काय करायचंय? मी भरीन नाहीतर नाही. आल्यापासून बघतोय,साधं कसा आहेस,एवढ पण विचारलं नाहीएस तू मला. नुसतं Bossing करतेस. जीव नकोसा झालाय घरात बसून नुसता. रोज संध्याकाळी ग्राउंड वर मित्र football खेळताना दिसले की डोकच उठतं. वरून तुला साधी दोन वाक्य नीट बोलता येत नाही का गं?’

‘तू तुझ्याच चुकीमुळे पडला आहेस राघव,थोडं तर सहन करावंच लागणार ना.’

‘आता मात्र कमाल झाली! अगं पेशंट शी असं बोलतं का कोणी? एवढं लागलंय. दुखतंय केवढं.’ मुग्धा जोरजोरात हसू लागली. राघव चा त्रागा अजूनच वाढला.

‘हसतेस काय मूर्खासारखी? मी सांगून ठेवतोय,मी मारीन हं  धा तुला आता.’

‘हसू नको तर काय? पेशंट म्हणे. वागा आधी पेशंट सारखं. आणि १५ दिवस झालेत प्लास्टर लागून. अजून दीड महिना काढायचाय. किती कौतुक करणार त्याचं?’
राघव ने रागात रिमोट फेकून मारला. मुग्धा ने तो सहज चुकवला.

‘जा.तुझा तो कॉलेज crush, काय नाव त्याचं? हं अनिरुद्ध. तो पडला आणि पाय तुटला त्याचा की कळेल तुला.’

‘ते मी बघीन माझं..पुस्तक उघडा फिजिक्स चं आपलं.’

‘I HATE YOU मुग्धा. तू आत बस रूम मधे अभ्यासाला. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. I can study on my own.’ राघव रागात ओरडला.

‘जातेय. मलाही तुझ्याबरोबर अभ्यास करायचा नाहीए. अभ्यास कमी आणि timepass जास्त.’ मुग्धा आत जाता जाता बोलली.

‘आणि माझ्याशी बोलायची काही एक गरज नाहीये. गप अभ्यास कर नाहीतर घरी जा सरळ.’

‘काकूंनी सांगितलंय म्हणून येते मी इथे अभ्यासाला.तुझ्यासाठी नाही.’
-----------------------------
४ वाजले होते. दोघही एकमेकांशी नं बोलता अभ्यास करत बसली होती. राघव मनातल्या मनात रागाने धुमसत होता. बास. उद्यापासून मुग्धा ला सांगून टाकायचं,तू इथे यायची गरज नाहीये. मी बघीन माझं. आणि आता अभ्यास एके अभ्यास. कोणीही येऊन आपल्याला अभ्यासावरून बोलून जावं याला काय अर्थ आहे? हिचं काय कौतुक? काय समजते स्वतःला कोणास ठाऊक? १२ वी ला आता हिच्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत जास्त मार्क्स पडलेच पाहिजेत. त्याने ठरवून टाकलं होतं. तेवढयात आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. नकळत त्याच्या इच्छेविरुद्ध राघव ओरडला.

‘धा,हजारदा सांगितलंय माझ्या गोष्टींना हात लावू नकोस म्हणून.’
तोपर्यंत मुग्धा हातात दोन तीन बॉक्सेस घेऊन बाहेर आली होती.

‘हे काय आहे आता?’

‘चेस,लुडो,सापशिडी,पत्ते. सांगा काय खेळणार आपण?’

‘मी तुझ्याशी बोलत नाहीए.’

‘ते दिसतंच आहे.’

‘मला काही खेळायचं नाहीये.’

‘ते ही वाटलंच होतं मला. लहानपणी सारखं हरणार परत. म्हणून घाबरून नाही म्हणतो आहेस तू.’

‘आवरा. किती खोट! तूच हरायचीसं आणि रडायचीसं.’

‘हो? मग एकदा पत्त्यांमध्ये हरल्यावर माझ्या बाबांकडे रडत रडत कोण गेलं होतं तक्रार घेऊन?’

‘तू पत्ता लपवलेला मुद्दाम. आणि मी परत एकदा सांगतोय मी रडत नव्हतो. सायनस मुळे डोळ्यात पाणी यायचं सारखं तेव्हा.’

‘बरं. राहिलं.’

‘राहिलं काय? आत्ता वाट पत्ते. लगेच कळेल कोण रडतं नेहमी ते.’ 
जणू त्याने हो म्हणायची वाट बघत असल्यासारखी ती लगेच पत्ते पिसायला लागली. राघव च्या चेहऱ्यावर नकळत स्मितहास्य फुलत होतं.

त्या भांडणातलं मैत्र फक्त त्या दोघांनाच दिसत होतं.

Tuesday, January 3, 2012

Common Man


३१ डिसेंबर गेला. १ जानेवारी चा रविवार सुध्दा निष्क्रियतेत घालवला. T.V. वर बघण्यासारखं होतं ते सगळं बघून काढलं. २ जानेवारी चा सोमवार उगवल्यावर मात्र तो नाईलाजाने उठून office ला जायला तयार झाला. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या,जल्लोष,दारू सगळंच संपलं होतं म्हणाना. कपडे घालत असताना त्याच्या मनात परवा office मध्ये घडलेलं संभाषण आठवत होतं. जोशी म्हणत होता checks चे shirt आता old fashion झालेत. बदल म्हणून. नवीन वर्षाच्या निमित्ताने जुने shirts तरी बदलले पाहिजेत. जुनं ते सोनं म्हणायचा एक काळ होता. आता नवीनच म्हणी आल्या आहेत.जुनं ते टाकाऊ हेच रूढ झालंय. तेवढयात बाहेरून आवाज आला. ‘अहो निघताय ना? डबा तयार आहे. लोकल सुटली तर taxi ने जावं लागेल.नव्या वर्षी पहिल्याच दिवशी भुर्दंड.
लोकल रोजच सुटत होती.अगदी ९.३२ शार्प.आजही सुटेलचं. त्यावेळात आपण स्टेशन वर पोहोचलो म्हणजे जिंकली. असे लहान लहान विजय त्याच्या आयुष्यात खूप महत्वाचे होते. लोकल वेळेवर पकडणं,ऑफिस मध्ये बॉस चं firing चुकवणं,झोपडपट्टी च्या गणपती ची वर्गणी न देऊन ही सुखरूप असणं. अजून असे कितीतरी. जणू या विजयांवर चं त्याचं आयुष्य चालू होतं.
गाडीत बसल्या बसल्या तो विचार करत होता,एक संपूर्ण वर्ष गेलं. ३६५ दिवस. प्रत्येक दिवसाचे २४ तास. आता २४ गुणिले ३६५ म्हणजे कितीतरी हजार तास. तसं त्याचं गणित शाळेपासूनच कच्चं होतं. त्यात मिनिटांची तर गणतीच नाही. इथे अगदी एक मिनिट जरी लेट झालं तरी लोकल सुटायची. ह्या प्रत्येक दिवसात, तासात, मिनिटात सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर कित्येक घटना घडल्या. आपण त्याचा कितपत आढावा घेतला? त्या घटनांचा आपल्या आयुष्यावर काय फरक पडला? तो विचार करत होता. असं विचार केल्याने त्याचं त्यालाच बरं वाटायचं. काही क्षण का होईना आपण मोठे विचारवंत आहोत हा भाव मनात येऊन जायचा. परत घरी बायकोला आणि ऑफिस मध्ये जोश्या ला सद्य परिस्थितीबद्दल ४ विचार ऐकवता यायचे ते वेगळेच. तेवढचं आपलं वर्चस्व दाखवल्यासारखं. या विचार प्रक्रियेला त्याने चिंतन असं भारदस्त नाव दिलं होतं.
तर हे वर्ष विविध घडामोडींचं राहिलं निश्चितच. पण म्हणून त्याने त्याच्या आयुष्याला काय कलाटणी मिळाली? ट्युनिशिया इजिप्त लिबिया मध्ये सत्तांतर झाले. लोकशाही चा दणदणीत विजय. किती सुंदर नाव दिलं त्या क्रांती ला लोकांनी. जास्मीन क्रांती. पण त्या क्रांती ने घडवलं काय? पेट्रोल डीजल महागले. परिणामतः रोजच्या वापरातल्या सगळ्याच वस्तू महागल्या. महिन्याचा पगार परत एकदा पुरेनासा झाला. एवढं सगळं होऊनही त्या देशांमध्ये स्थैर्य आलं,तिथल्या लोकांचं राहणीमान सुधारलं तर तसंही नाही. मग घडलं काय?
विचार करता करता त्याने नकळत त्याचा गोल चष्मा काढून हातात घेतला.एकेकाळी गांधींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन घातलेली ती गोल फ्रेम. २०१२ मध्ये तशी out of fashion चं आहे. जाऊदे. जिथे स्वतः गांधी old fashion झाले तिथे त्यांची फ्रेम कुठे घेऊन बसता. सध्या काळचं प्रतीगांधींचा आहे. काय करणार? त्याने मनात आलेले हे विचार झटकून टाकले आणि विचारांची गाडी परत रुळावर आणली.
वर्षभर भ्रष्टाचार भारतात news channels वरचा मुख्य मुद्दा होता. आधी commonwealth मग आदर्श मग 2G चं तर काही विचारायलाच नको. अण्णांनी लोकपाल मागितला. उपोषणं केली. मीडिया गाजवली. त्याला मात्र शेवटपर्यंत कळलं नाही की लोकपाल आल्याने एकाएकी भाज्यांचे भाव कमी होणार? का त्याचा पगार महिन्याला पुरायला लागणार? आणि जर दोन्ही होणार नसेल तर त्या लोकपालचा त्याच्या सारख्याला उपयोग तरी काय? या प्रश्नाचं उत्तर त्याला कुठलंच TV channel देत नव्हतं. बहुदा याचं उत्तर अण्णांकडे पण नसावं. त्याला स्वतःच्याच विचारांचं हसू आलं. पण मग त्याने लगेच स्वतःला आवर घातला. चिंतन करत असताना हसणं हे निव्वळ उथळपणाचं लक्षण होतं.
चिंतन करता करता त्याचं स्टेशन कधी आलं त्यालाचं कळलं नाही. स्वतःच्याच विचारात तो सवयीने स्टेशन वर उतरून गर्दीत मिसळला. कित्येक वर्ष रोजचं तो या अश्या गर्दीत मिसळत होता. गर्दी वाढतचं होती. त्याची निरीक्षण शक्ती मात्र अजूनही तेवढीच तीव्र होती. खरतरं गेली किती वर्ष हेच चालू होतं. महागाई वाढत होती,भ्रष्टाचार चालूच होतं,पगार कधीच पुरत नव्हता. आयुष्यात तोचतोच पणा आला होता. काही किरकोळ बदल घडू लागले होत नाही असं नाही. धोतर जाऊन ‍‌पँट आली. आता पुढे कधीतरी बहुदा चेक्स चा शर्ट ही जाईल. गांधींची आदर्श फ्रेम ही न जाणो अमिताभ च्या fashionable फ्रेम ने बदलल्या जाईल. ते टक्कल मात्र तसचं असेल,ते जाणं शक्य नाहीच. नवीन वर्षात हा आवरणाचा एवढा बदल तरी हवाच. कारण कितीही प्रयत्न केला तरी त्या आवरणातला माणूस हा नेहमी सामान्यचं राहणार आहे.
परवा मी सहज मित्राबरोबर कट्ट्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत उभा होतो. तेवढयात तो दिसला. बाजूलाच बसला होता. आमचं बोलणं शांतपणे ऐकत. मला वाटलं आता तो सुद्धा काहीतरी बोलेल,त्याचं मत मांडेल. पण तो काहीच बोलला नाही. मग लक्षात आलं. इतक्या वर्षात त्याला बोलताना बघितलंय कोणी? तो तर जन्मभर नुसता बघत,ऐकत आलायं. मग मीच आपला बोलत राहिलो. थोड्यावेळाने तो उठून निघून गेला. बहुदा दुसऱ्या कुणाचं तरी ऐकायला.

Wednesday, June 29, 2011

तो आणि ती..


हिवाळा उतरंडी ला लागला होता. पानगळ सुरु झाली होती. एका डेरेदार वृक्षाखाली ते दोघं एकमेकांच्या मिठीत विसावले होते.त्या सुखद शांततेला एक पूर्णत्वाची  जाणीव देत.
“माझ्याशी लग्न करशील?” त्याने अचानक पणे विचारलं.
“लग्न म्हणजे काय?” उत्तरा ऐवजी तिचा निरागस प्रश्न.
“लग्न म्हणजे आपण एकत्र येण्यासाठी म्हणून केलेले विधी.”
“पण तसे आपण आत्ताही एकत्रचं आहोत की”
“तसं नाही गं, नेहमी एकत्र राहण्यासाठी”
“अरे पण त्यासाठी लग्नाची काय गरज?तू कधीही म्हणलास तरी मी यायला तयार आहे तुझ्या बरोबर”
“अगं तसं करून कसं चालेल?समाजाचा काही विचार नको का करायला?” त्याचा त्रासून प्रश्न.
तिचं नुसतचं खळखळून हसणं.
“आता त्यात हसण्यासारख काय आहे?”
“मला सांग समाज स्वीकारेल आपला नातं?”
“का?का नाही स्वीकारणार?तू श्रीमंत घराण्यातली आहेस म्हणून?का मी खानदानी नाही म्हणून?का तू so called उच्च जातीतली आहेस म्हणून?”
“तू चिडतोस ना तेव्हा गोड दिसतोस खूप”
“उगाच विषय बदलू नकोस”
“अरे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला देखील माहिती आहेत. आणि तू म्हणालेल्या गोष्टींपैकी एकही माझ्या मनातली नाहीये,पण तूच समाजाचं नाव काढलंस म्हणून आठवण करून दिली रे तुला फक्त समाजाच्या विचारांची”
. . . . . .
“बरं लग्न करायचं म्हणजे समाजाच्या नियमानुसार करावे लागणार. मग माझ्या धर्मातलं लग्न तुझ्या धर्माला चालणार नाही आणि तुझं मला.”
“हे धर्म बिर्म काही नाहीये गं,तू ज्या घरात लहानाची मोठी झालीस त्या घरचा धर्म तो तुझा धर्म.”
“ते तुझ्या माझ्या साठी रे.समाजाचे काय?” तिचा मिश्कील प्रश्न.
“ठीके! ठीके! समाजासाठी नाही, माझ्यासाठी.मला इच्छा आहे लग्न करायची. मला एकदा तू नटून थटून कशी दिसतेस ते बघायचं आहे.लग्नाच्या जोड्यातली नववधू.तुमच्या शेजारी ते बापट राहतात ना, त्यांच्या मुलीच्या लग्नासारखं अगदी. ”
“हां,हे एक valid reason आहे. तशी मलापण इच्छा आहेच,तुला नटलेल्या नवीन कपड्यात बघायची.डोक्यावर फेटा आहे,मस्त सुटाबुटात नवरदेव गाडीतून उतरतायत.”
दोघांनी एकमेकांकडे बघितलं,काही क्षण शांतता आणि मग दोघही जोर जोरात हसू लागले.
तेवढ्यात मागून जोरात कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आला.
”sweety...ए sweety....
here you are?हज्जारदा सांगितलं घराबाहेर पडायचं नाही म्हणून,पण तुला कळेल तर शप्पत.”
बोलता बोलता तो मुलगा तिच्या गळ्यात पट्टा अडकवत होता. तेवढ्यात मुलाची नजर त्याच्यावर गेली.“ए हाड...परत आमच्या sweety बरोबर दिसलास तर बघ. रस्त्यावरचं कुत्रं ते घाणेरडं,तरी त्या खाटकाला सांगितलं आहे तुझ्या कुत्र्याला बांधून ठेवत जा म्हणून,हाड चल..” मुलाने त्याच्यावर एक दगड भिरकावला.अन् तिला घेऊन तो घरच्या दिशेने चालू लागला.
त्याने तिच्या कडे बघितलं,तिच्या नजरेत आता स्वप्नं होती,त्याला सुटाबुटात बघणारी. त्याच्या नजरेत मात्र वास्तव उतरलं होतं..
त्या मुलाकडे बघून,एकदा गुरकावून तो आपल्या घराकडे वळला.

Friday, May 13, 2011

भांडण


परवा गाडीत पेट्रोल टाकायला साधारण नऊच्या सुमारास पेट्रोल पम्पवर गेलो.पुणेकर जितक्या सभ्यपणे रांगा लावून उभे राहू शकतात तितक्या सभ्यपणे उभे होते.मी पैसे काढत होतो तेवढ्यात मागून खाडकन आवाज आला.त्यापाठोपाठ २ ३ छप्पर तोड शिव्या.मागे वळून बघितला तर एक बाई साधारण पणे ३५ ते ४० वय,निम्न मध्यमवर्गीय घरातली,पम्पावरच्या एका कर्मचाऱ्याला चपलेने थोबाडत होती.त्याने कमी पेट्रोल भरले आणि जाब विचारल्यावर उद्दाम पणे उत्तर दिले म्हणून.जवळच तिचा नवरा उभा होता आणि अर्वाच्य अश्या शिव्या घालून बायकोचा उत्साह वाढवत होता.तो कर्मचारी सुद्धा तेवढ्याच हिरारीने त्याच्याकडचा शिव्यांचा stock बाहेर काढत होता.सगळा पंप त्यांच्याकडे टकामका बघत उभा.थोड्यावेळात त्यांच्याच लक्षात आले कि त्यांचे भांडण हे जनतेसाठी फुकटची करमणूक होतेय मग मात्र त्यांनी आटोपत घेतलं आणि नवरा बायको मार्गस्थ झाले.घरापर्यंत च्या रस्त्याभर माझ्यामनात मात्र एकच प्रश्न येत होता,रस्त्यात त्या नवरा बायकोचा संवाद काय असणार?”वा काय थोबाडलास त्या माणसाला”,”मग,ऐकून घेतेय का मी त्या मुडद्याच? बाकी तुम्ही पण मस्त शिव्या घातल्या हो त्याला”. आणि तो माणूस घरी जाऊन काय सांगणार?”आज मी माझ्या असभ्य बोलण्यामुळे एका बाई च्या हातून मार खाल्ला?”
मला नेहमी हा प्रश्न पडतो कि लोकांना भांडण्याची एवढी खुमखुमी येते कशी?शाब्दिक वाद एकवेळ समजू शकतो,पण चार चौघात सरळ एखाद्याला थोबडणे म्हणजे अतिशय हिंमतीचे काम आहे.आम्हाला समोरच्याची चूक असताना पण ते त्याच्या तोंडावर सांगायची हिम्मत होत नाही.असंच परवा मी एका दुकानात recharge करायला गेलेलो असताना दुकानदाराने MRP वर एक रुपया जास्त मागितला,का विचारल्यावर हे असचं आहे घ्यायचयं तर घ्या असं typical पुणेरी उत्तर.मी आपला मनातल्या मनात त्याला ४ सणसणीत शिव्या हासडल्या आणि इथे परत यायचे नाही ही मनाशी खूणगाठ बांधून निमुटपणे त्याला एका रुपयाने श्रीमंत केले.
माझ्यासारखी पापभीरू धर्मभीरू(खरतर भित्री) माणसं जास्तीत जास्ती एवढचं करू शकतात.रस्त्यावरची घाण असह्य झाली की सरळ रस्ताच बदलायचा(जास्तीत जास्त संध्याकाळी कट्ट्यावर सरकारला चार शिव्या घालायच्या की झालं) बरं असही नाही की आमच्या आयुष्यात कोणी असं येत नाही ज्याला एक सणसणीत हाणावी असं वाटावं.भ्रष्ट राजकारणी,लुटणारे दुकानदार,आपण शिस्तीत सिग्नल वर थांबलेलो असताना सुसाट वेगात सिग्नल तोडून जाणारा bike वाला एक न दोन दिवसातून एखाद्या तरी अश्या माणसाशी गाठ पडतेच.मग आपणच स्व:ताची समजूत काढायची,आपण समाजाच्या चौकटीत राहतो,चारचौघात भांडणं हे सभ्य माणसाला शोभून दिसत नाही,आपण कशाला त्याच्या पातळीवर उतरायचं?त्याला नसली तरी आपल्याला काही dignity आहे.पण खरंतर आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाने स्वताच्या हक्कासाठी चारचौघात भांडणे हे अतिशय दुर्मिळ दृश्य आहे,(हं आता तुम्ही पुणेकर असाल तर गोष्टच वेगळी) पेट्रोल पंप वर पैसे जास्त घेऊन पेट्रोल कमी टाकले,जाऊदेत आता म्हणल्यावर तर टाकतोय न तो पूर्ण.ऑटो वाला उद्दाम पणे बोलला,जाऊदेत आपण कुठे मनाला लावून घेतोय.
पण असं काहीतरी बघितल्यावर मात्र वाटतं सालं आपण असतो तर काय केला असतं,निमूटपणे २ वाक्य बोलून बाहेर पडलो असतो,म्हणजे तो पंप वाला दुसऱ्याला गन्डवायला मोकळा.मग मात्र उद्विग्नता येते. वाटत साला सगळ समाज,सभ्यता गेली खड्यात.समाज,सामाजिक बंधनं ही काय फक्त आपल्यासाठीच आहेत?समोरच्याने कसंही वागायचं,सगळे नियम मोडायचे आणि तरी ताठ मानेने फिरायचं आणि आपण मात्र स्वःताला नियमांच्या चाकोरीत बांधूनही नेहमी मान खाली घालायची.अहिंसा सुद्धा त्यालाच शोभते जो हिंसा करण्यास समर्थ असतो.कधीतरी जशास तसचं वागावं लागतं.मनात ठरवतो आता यापुढे आपली चूक नसताना बिलकुल मान खाली घालायची नाही.समोरच्याला चांगला खडसावायचा,अगदी जशास तसं उत्तर द्यायचं.आणि दुसऱ्याच क्षणी समोरून wrongside ने एक bike वाला भन्नाट speed ने येऊन कट मारून रागाने बघत जातो जणू माझीच चूक आहे.मी निमुटपणे मान खाली घालतो,तोंडातल्या तोंडात sorry पुटपुटतो आणि घरच्या दिशेने निघतो.