Friday, August 9, 2013

भेट


गंधार सतत घड्याळाकडे बघत होता. तसा तो वेळेच्या आधीच पोहोचल्या असल्या मुळे त्रागा करून काही अर्थ नाही हे त्यालाही माहित होतं. पण त्याच्या अस्वस्थतेला कारण ही तसच होतं. कितीतरी वर्षांनी तो मेधा ला भेटत होता. कॉलेज संपल्यावर बहुदा पहिल्यांदाच. ४-५ वर्ष तर नक्कीच झाली. का भेटलो नाही? खरंतर काहीच कारण नव्हतं. या नं त्या गोष्टीमुळे राहून गेलं. आधी तिचं बंगलोर ला ट्रेनिंग, मग future च्या प्रोजेक्ट साठी आपलं भारत भ्रमण, आणि त्यांनंतर संपर्क तुटला तो तुटलाच. त्याला वाटलं आपण उगाच आपली कारणं शोधायचा प्रयत्न करतोय. गेली किमान ३ वर्ष ती पुण्यातच होती. तो ही येऊन जाऊन इथेच असायचा. भेटायचं म्हणलं तर कधीही भेटता आलं असतं.
पण मग नं भेटण्यासारखं तरी काय होतं? काहीच नाही. घाईगडबडीत कशाला? निवांत गप्पा मारायला भेटू या विचारातचं एवढी वर्षं कधी निघून गेली कळलचं नाही.
एखादं पुस्तक असतं. लहानपणी आपल्याला खूप आवडलेलं आणि नंतर कुठेतरी गहाळ झालेलं. कित्येक वर्षांनी पुढे आपल्याला असंच एखाद्या दुकानात बुकशेल्फ वर दिसतं आणि किंमत वगैरे काहीही विचार नं करता आपण ते घरी घेऊन येतो. कधी एकदा हे पुस्तक वाचतोय असं होऊन जातं अगदी. पण कितीही असं वाटतं असलं तरी ते पुस्तक वाचायचं राहूनच जातं. घाईत नको निवांत वाचू म्हणून कधी ते घरातल्या बुकशेल्फ वर जाऊन बसतं कळतही नाही. दरवेळेस ते पुस्तक उघडावं आणि काहीतरी वेगळंच आठवावं. एकाच वेळी ते वाचायचंही असतं आणि नसतही. भीती असते कुठेतरी मनात की लहानपणी आवडलेलं ते पुस्तक आता बालिश वाटेल. लहानपणीच्या आठवणींना गालबोट लागेल.
तसच काहीसं झालं होतं त्यांच्या मैत्रीचं.
गंधार ला स्वतःच्याच विचारांची मजा वाटली. त्यांच्या मैत्री ला पुस्तकाची उपमा देणं ही गंमतच होती. दोघांच्या मैत्रीची सुरुवात हीच पुस्तकांनी झालेली. वाचन हा त्या मैत्रीतला महत्वपूर्ण बंध होता.
तेवढयात दुरून ती येताना दिसली. अगदी वेळेवर. नेहमीसारखीच. नकळत गंधार चा हात त्याच्या केसांवरून फिरला आणि दुसऱ्याच क्षणी त्याला त्या गोष्टीचं हसू आलं.
‘काय रे असा एकटाच हसतोयस काय?’
‘काही नाही, सांगतो नंतर. इतक्या वर्षात बिलकुल बदलली नाहीएस तू. काय कसा आहेस वगैरे काही नाहीच. लगेच आल्या आल्या असा का उभा आहेस, तसा का हसतो आहेस.’ तो हसत-हसतच म्हणला.
‘अरे मग काय. रस्त्यावर एकटाच वेड्यासारखा हसत उभा राहिलास तर वेगळं काय विचारणार?’ त्याच्या लक्षात आलं की तिनेही अगदी लाईट मेकअप केलाय.
‘ते सोड.काहीतरी खाऊ आधी. मला जाम भूक लागलीये. तू पहिल्यांदा येतेस नं इथे? इथला वडा जाम भारी असतो, आणि फिल्टर कॉफी अगदी आपल्या अण्णा सारखी.’
‘आहा. अण्णाची फिल्टर कॉफी. काय बेस्ट असायची रे ती. आणि ते लहान स्टील चे पेले. विसरलेलेच इतक्या वर्षात मी ते.’
दोघंही ऑर्डर देऊन एकमेकांकडे बघत बसले. काही क्षण दोघांना काय बोलावं कळलंच नाही. या गोष्टीचही गंधार ला हसू आलं.
‘हे बघ, परत हसतो आहेस. एवढं काय घडलंय हसण्यासारखं?’
‘सांगतो, सांगतो. पण आत्ता आणि तेव्हा दोन वेगळ्या कारणांने हसत होतो. मुद्दा एकचं कारण दोन.’
‘सांगणार आहेस की असंच पाल्हाळ लावणार आहेस?’
‘अगं, मघाशी तू येताना दिसलीस आणि नकळत माझा हात केसांवरून फिरला, शर्ट नीटनेटका करू लागला. तुझ्याकडे बघितलं तर तू ही लाईट मेकअप करून आलेलीस. आत्ताही समोरासमोर बसलो तर काय बोलावं तेच कळलं नाही दोन मिनिट. किती बदललोय गं आपण मेधा. असं नीटनेटके आहोत की नाही याचा विचार करणं, भेटल्यावर काय बोलावं हे नं सुचून शांत बसणं. किती नीरस झालोय आपण आयुष्यात.’
मेधा हे ऐकून मनापासून हसली. ‘खरंच किती म्हातारं झालंय आपलं आयुष्य. आधी भेटायचो तेव्हा एवढं काही असायचं सांगायला की पहिले दोन मिनिट कोण काय बोलतय हेच कळायचं नाही. आणि आता बघ.’
‘बोलायला तर अजूनही खूप काही आहे. पण unnecessary manners खाली दाबल्या गेलंय ते.’
‘माझं ठीक आहे. मी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये आहे. मला हे असे ettiquetes पाळावे लागतात रोजच्या आयुष्यात. पण तुझं काय? Freelance photographer तू. स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम करणारा. तुला कुठून लागल्या या वाईट सवयी?’ ती मिश्कील पणे म्हणाली.
‘ओ मॅडम! Freelance असलो तरी काम मिळवायला हे उपद्व्याप करावेच लागतात आम्हालाही.’
तेवढयात वेटर ऑर्डर घेऊन आला.
‘Coffee खरंच छान आहे इथली. पण अण्णाच्या कॉफी ची मात्र चव नाही हां याला.’
‘ए जा तू. एवढं काय असायचं त्या अण्णा च्या कॉफी मध्ये देवाला ठाऊक.कुठल्याही उडुपी हॉटेल मध्ये मिळेल तशीच कॉफी असायची ती. काय अमृताची चव लागायची तुला ते तुझं तुला माहित.’
‘काय माहित. खरंतर मलाही कधीकधी वाटतं त्या कॉफी पेक्षा त्या वातावरणाची धुंदच जास्त असायची मनावर. त्या वातावरणालाही चव होती बहुदा वेगळी. ते ग्रुप्स, भांडाभांडी, आणि गरम कॉफी पेक्षाही चालेल्या गरम-गरम चर्चा आणि वाद.’
दोघंही खळखळून हसले. कित्येक दिवसांनी त्याला एवढं जिवंत वाटत होतं. खूप जुना फोटोंचा अल्बम उघडून बसावं तसं.
‘ ए तुला ती मधुरा आठवते का रे? आपल्या प्रत्येका Function मधे गायची बघ? तुम्ही गरिबांची शोभा गुर्टू म्हणायचा तिला.’
‘कोण ती शोभा गुटूर्गु? गायची कसली, मोहित बरोबर flirt करायची फक्त सगळीकडे.’
‘हां तीच. तिचं आणि मोहित चं लग्न झालं गेल्या महिन्यात.’
‘काय? एवढ्या लौकर?’
‘लौकर काय गंधार? उलट उशीरच झाला होता. त्यातून मोहित सेटल नाही नीट. तरी झालं बाबा एकदाचं.’
‘ए उशीर काय म्हणतेस? या वयात कोण लग्न करतं?’
‘हॉ हॉ. कोण लग्न करतं म्हणे. तुमच्या कोशातून बाहेर या जरा. आपल्या batch ची ८०% लोकांची लग्न झाली तरी आहेत किंवा किमान ठरली तरी आहेत.’
‘असेलही. लग्न बिग्न विषयांपासून मी जरा दूरच असतो. मला सांग मग तू पण का नाही ठरवून टाकत आता? करियर तसं सेटल झालंय आता व्यवस्थित तुझं.’
‘आई आजी हात धुवून मागे लागलेत आधीच, तू सुद्धा तेच विचार. खरं सांगू का गंधार, मला ना लग्न करावसं वाटतंच नाही रे. आधीही नव्हतं वाटत, आत्ताही नाही. I mean, रोहित बद्दल खरंच सिरीयस होते मी. पण त्याचं ते तसं, सगळंच विचित्र झालं रे. रोहित धोरणी होताच. मलाही कुठेतरी जाणीव होती की त्याचं ultimate aim अमेरिका आहे. पण त्याच वेळी मनात हेही वाटलेलं की हा आपल्यासाठी तरी थांबेल. त्याला पूर्णपणे माहित होतं की आई आणि आजी ची सगळी जवाबदारी माझ्यावर आहे. स्पष्टपणे म्हणतो – “आई ला हवंतर घेऊन जाऊ, आजीला ठेऊ वृद्धाश्रमामध्ये. Be practical.” इतकी चीड आली नं त्याची. हा तोच रोहित आहे का अशी शंका आली.’
‘पण मग नंतर? ऑफिस, बाहेर कोणीच आवडलं नाही?’
‘एक दोघं जण आवडली होती. पण खूप थोड्या वेळासाठी टिकली ती नाती. माझ्या नं एक लक्षात आलंय गंधार. मी मुळातच खूप स्वयंभू आणि स्वतःमध्ये रमणारी मुलगी आहे. रोहित साठी आयुष्यात, स्वभावात बऱ्याच तडजोडी, बरेच बदल केले. कारण तो रोहित होता. पण बाकीच्यांसाठी एवढीही तडजोड सहन होत नाही.
आणि जाऊदेत ना. मी आहे तशी सुखी आहे. मनासारखं कमावते, पाहिजे तसं खर्च करते. आई, आजी, मी. Happy आहोत आम्ही तिघी एकमेकांबरोबर. शेवटी तेच महत्वाचं असतं ना?’
‘Yes, I guess.’
काही वेळ दोघंही शांत बसून होती. मग तो स्वतःशीच बोलल्यागत बोलू लागला.
‘तुला आठवतं मेधा, कॉलेज मध्ये सारखं तू मला मिडिल क्लास मिडिल क्लास चिडवायचीस? मला जाम राग यायचा तुझा. खरंतर आपण दोघंही सामाजिक, आर्थिक दृष्ट्या एकाच पातळीवर होतो.’
‘एकाच का?’ तिने मिश्किलपणे त्याचं बोलणं तोडत विचारलं. ‘उगाच modest होऊ नकोस. तुम्ही आमच्या पेक्षा कितीतरी पटींनी सुखवस्तू, श्रीमंत होता.’
‘तेच ते.  पण तुझं म्हणणं काय तर माणूस सामाजिक स्थितीने नाही तर त्याच्या विचारांने मध्यमवर्गीय ठरतो. पटायचं नाही तेव्हा. पण आज वाटतं बरोबर होतं तुझं. हेच पहा ना. तू मोकळी आहेस, आनंदी आहेस, आई आजीची व्यवस्थित काळजी घेतेस. मुख्य म्हणजे स्वतःच्या पायांवर उभी आहेस. करियर जोरात आहे. पण मला चिंता कसली, तर तुझं लग्न करायची इच्छा नाही. आयुष्यात पुढे कशी जाशील, सुखी कशी होशील हे सगळे प्रश्न येतात मनात तुझं बोलणं ऐकून. जणू लग्न केल्याशिवाय माणूस सुखी होऊच शकत नाही.’
‘तसं नाही रे. तुला वाटतं तसं मलाही कित्येकदा वाटतंच. आईचं आणि माझं तर हजारदा या विषयावरून भांडण झालंय. आजीचे जप, तप, उपास, तापास सगळे करून संपलेत. आणि मलाही वाटतंच कधीतरी. लग्न करावं, छान घर, family असावी. Peer pressure ही असतंच शेवटी. पण हे सगळं दोन क्षणच येतं मनात. तिसऱ्याच सेकंदाला वाटतं, आपण स्वतःवर जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम करणारा भेटणारे का आपल्याला? माझ्या प्रमाणे वागणारा? आणि नसेलच भेटणार तर काय उपयोग अश्या तडजोडीच्या नात्यांचा?’
‘आणि भेटला समज एखादा असा तर?’
‘भेटला तर बघीन ना. मी काही संत, संन्याशी, किंवा अगदी faminist वगैरे नाही, लग्नाचा तिरस्कार करायला. मला एवढंच वाटतं की त्या संस्थेत मी बसत नाही.
जाऊदेत. माझं सोड. तुझं काय सुरु आहे? सारखं आपलं मलाच प्रश्न विचारतो आहेस. काम धाम काय म्हणतंय?’
‘काम काय गं, म्हणलं तर चाललंय जोरात, म्हणलं तर काहीच नवीन दिसत नाहीये करायला. सगळं तेच तेच आणि तेच तेच. कोणाला सांगितलं ना हे, तरी कळत नाही. बाबा विचारतात तेच तेच नसणार तर काय सगळीकडे हेच असतं. आई म्हणते प्रत्येकाला एवढ्या वेगळ्या क्षेत्रात करियर करायला मिळत नाही. Lucky आहेस.
पटतं गं सगळं. पण माझी तगमग का होते ते कसं समजावून सांगू लोकांना. मलाच समजलंय की नाही हाही प्रश्न पडतो. पण काही झालं तरी हा प्रवास इथेच संपतोय हे मात्र नक्की. अजून बोललो नाहीये कोणालाच, पण नॉर्वे हून एक ऑफर आलीये internship ची. पैसे जास्त मिळणार नाहीएत. इथल्या तुलनेत तर काहीच नाही. करियर ची पण बसलेली घडी विस्कटेल. पण जेव्हा पासून ती संधी आलीये, मला नॉर्वे सारखं खुणावतंय. घरी महाभारत होणारे मी सांगितलं की. पण मी जायचं नक्की केलंय.’
‘कधी निघणार आहेस?’
‘साधारण ३-४ महिन्याने. आता आयुष्याचा next stop - Norway.’
तिच्या ओठांवर ओळखीचं हसू उमटलं.
‘मला आठवतं अजून. कॉलेज मध्ये असताना, फेब्रुवारी, मार्च सुरु झाला कि तू एकदम खूष व्हायचास. कोरडा वारा, उबदार सकाळ, मोहाच्या फुलांचा सुटलेला वास. सगळं साठवून घ्यायचास जणू शरीरात. उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे असं भेटेल त्याला सांगायचास.
हा सगळा उत्साह तुझा १५-२० दिवस टिकायचा. मग मात्र २ महिने गर्मी, उन्ह, घाम यांच्या नावाने शिमगा. कि परत जून-जुलै मधे उत्साहात. ओल्या मातीचा वास, हिरवळ जणू बोलायला लागायचे तुझ्याशी. परत पावसाळा माझा सर्वात आवडता ऋतू आहे म्हणून announcement. तुला ना मुळात कुठलाच ऋतू आवडायचा नाही गंधार. आवडायचा तो फक्त बदल. तुझा उत्साह असायचा तो फक्त त्या बदलासाठी.’
तिच्याकडे बघून तो ओशाळल्यागत हसला. तिच्या बोलण्यात तथ्य आहे हे त्यालाही माहित होतं. थोडावेळ दोघं काही नं बोलता नुसते बसून राहिले. कित्येकदा शांतता ही जास्त बोलकी ठरत असते बहुदा.
मेधा चा फोन वाजला.
‘आईचा फोन आहे. निघायला हवं.’ ती इच्छा नसल्यासारखी बोलली.
‘खूप बरं वाटलं मेधा भेटून. एक निखळ नात्याची छायाचित्रं धुसर झाली होती, ती पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छ झाल्याचं समाधान मिळालं.’
‘आपण परत-परत भेटलं पाहिजे रे.’
‘खरंच.’
‘नुसतं तोंडदेखलं म्हणू नकोस. पुन्हा भेट कधी ते सांग.’
‘अशीच कधीतरी. ते लहानपणी चं पुस्तक पुन्हा उघडून वाचावसं वाटलं की लगेच.’
एवढं बोलून तिला काही विचारण्याची संधी नं देता तो bye म्हणून त्याच्या गाडीच्या दिशेने चालू लागला. तिला तो काय बोलला काहीच कळलं नाही. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत राहिली. तिला तो कधीच पूर्णपणे समजला नव्हता. त्यालाही ती कळली नाहीच बहुदा. पण याने त्यांच्या मैत्रीवर कधीच फरक पडला नाही.

एक प्रसन्न संध्याकाळ सरत होती. ती ही तिच्या घराकडे निघाली. झटपट पडणाऱ्या काळोखात दोघं कधी विरून गेली कुणालाच कळलं नाही.

5 comments:

kartikijoshi said...

खूपच छान :)

indraneel said...

Dhanyawad :)

सौरभ said...

तुला ना मुळात कुठलाच ऋतू आवडायचा नाही गंधार. आवडायचा तो फक्त बदल. तुझा उत्साह असायचा तो फक्त त्या बदलासाठी. << this is the killer one.. fact...

Suhas Diwakar Zele said...

सुंदर :) :)

indraneel said...

Dhanyawad Saurabh ani Suhas.. :)